मागच्या आठवड्यात आम्ही एका मित्राकडे गेलो होतो आणि रात्री दहाच्या सुमारास कारने घरी परत येत होतो. एका अंधाऱ्या रस्त्याने जात असताना एकदम जाणवलं की रस्त्याच्या कडेला एक माणूस फीट येऊन पडलाय आणि त्यांचे हातपाय हलत आहेत. परागने कार पुढे नेऊन थांबवली, आणि मी उतरून पटकन त्या माणसापाशी गेले. त्याचा एक हात आणि एक पाय हलणं सुरूच होतं, आणि मला जाणवलं की तो खूप जोरात पडला असणार, कारण कपाळ फुटून रक्त येत होतं. इतर माणसं पण भराभर थांबत होती. पराग आणि मी त्या माणसाला कुशीवर वळवलं, आणि अपेक्षित असल्याप्रमाणे त्याची लाळ खाली गळू लागली. त्याचा त्रास कमी होत होता, तर मी थोडं त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागले, तुमचं नाव काय वगैरे; पण तेवढ्यात त्याला परत दुसरी फीट आली जोराची. इतक्यात कुणीतरी त्याच्या हातात एक किल्ली दिली होती, आणि कुणीतरी जवळच्या हॉटेलातून कांदा पैदा करून तो त्याच्या नाकाला लावला होता, आणि कुणीतरी चमचा पैदा करून त्याच्या तोंडात घालायचा प्रयत्न करत होतं. पराग आणि मी सांगत होतो त्यांना की हे काही करू नका म्हणून ; पण त्या जमावाचा उत्साह एवढा होता की हे होणं भाग होतं. तेवढ्यात तिथे एक वॉचमन धावत आला आणि त्याने त्या फीट आलेल्या माणसाची ओळख सांगितली. तो ही वॉचमनच होता तिथला, आणि शिफ्ट संपवून घरी चालला होता. त्याने असंही सांगितलं की पूर्वी सुद्धा त्याला एकदा अशी फीट आली होती, आणि तो काहीच औषधं घेत नाही म्हणाला होता. पराग आणि मी सगळ्यांना सांगत होतो, काय करा, काय करू नका वगैरे. आता त्या माणसाची फीट हळूहळू थांबू लागली. समोरच हॉस्पिटल होतं. तेव्हा तिथला एक रिक्षावाला म्हणाला की मॅडम, आम्ही घेऊन जातो त्याला तिथे. कारण जखमा पण खूप आहेत.
पराग आणि मी निघालो. दोघं सुन्न होतो. फिट्सचा त्रास असलेली अशी करोडो माणसं असतील भारतात. गरिबीने गांजलेली. उपचार न घेणारी. किंवा थोडासा उपचार घेऊन औषधं बंद करणारी. सरकार तर्फे देशभर खूप मोठा अवेअरनेस प्रोग्रॅम होणं गरजेचं आहे. आणि जी काही थोडीफार औषधं सरकारी दवाखान्यात स्वस्त किंवा फ्री मिळतात, ती सगळीकडे भरपूर उपलब्ध असणं गरजेचं आहे…
किती काम वाढणं गरजेचं आहे! … आपलं काम अजून खूप वाढणं गरजेचं आहे…
****
त्या निमित्ताने इथे परत लिहिते – फीट आली असता काय करावे व काय करू नये:
आधी मी काय करू नये ते लिहिते. एपिलेप्सीचा झटका आलेल्या व्यक्ती भोवती खूप माणसांची गर्दी करू नये. काळजी घेण्यासाठी १-२ माणसे पुरतात. व गर्दी बघितल्यामुळे त्या व्यक्तीला ऑकवर्ड वाटू शकते, व गर्दीमुळे सफोकेटींग सुद्धा होऊ शकते. फीट आलेल्या व्यक्तीच्या नाकाला कांदा लावणे व चप्पल हुंगायला देणे, चमचा तोंडात घालणे, पाणी प्यायला देणे, हे पूर्णपणे गैरसमज आहेत!! तसं काहीही करू नये!
एपिलेप्सीचा झटका आल्यावर पुस्तकात दिलेली काळजी तर घ्याच, पण एक अतिशय जरुरी असलेली गोष्ट म्हणजे प्रेम! हे कुठल्याही पुस्तकात नसेल, पण वास्तवात त्याची अत्यंत गरज आहे. म्हणजे झटका आलेल्या व्यक्तीला पाठीवर थोपटून, किंवा जवळ घेऊन, “काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर” एवढं प्रेमाने सांगितल्यावर ९९% बरं वाटतं!!! त्या व्यक्तीचे हातपाय हालत असतील तर ते कुठे आपटत नाहीत ना, आणि तिला काही इजा होत नाही ना, ह्याची काळजी घ्या. पण ते हलणारे हात-पाय धरून ठेऊ नका. ती हालचाल होऊ द्या. त्या व्यक्तीला जवळपास शक्य असेल तिथे बसवा. थोडा वारा घाला. घट्ट कपडे असल्यास शर्टाचे वरची दोन बटणे उघडा. बायकांची ओढणी सैल करा. स्कार्फ काढा. वारा घाला. किंवा घरी असल्यास कॉटवर कुशीवर झोपू द्या. पंखा लावा. उताणं नको. कारण तोंडातून लाळ गळत असेल तर कुशीवर झोपवल्याने ती लाळ बाहेर जाऊ शकेल. पण उताणं झोपवलं तर सेमी-कॉन्शस असल्याने ती लाळ माणसाच्या श्वासनलिकेत जाऊ शकते. परत परत त्या व्यक्तीला “काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्याबरोबर” हे सांगा.
अशा परिस्थितीत माणूस सहसा ५-१०-१५ मिनिटात नॉर्मलला येतो, पण खूप थकलेला असतो. त्यामुळे त्याला रिक्षा-टॅक्सी करून देणे किंवा घरी सोडायला मदत करणे हे आपण जरूर करू शकतो. पण जर ती व्यक्ती १५ मिनिटात नॉर्मल नाही झाली तर जवळच्या हॉस्पिटलमधे घेऊन जा. (असं क्वचित होतं अर्थात.)
एपिलेप्सी असलेल्या व्यक्तींना आम्ही खिशात नेहमी आयकार्ड ठेवायला सांगतो व जवळच्या माणसाचा कॉन्टॅक्ट लिहून ठेवायला सांगतो. त्यामुळे माणूस जर लवकर शुद्धीवर नाही आला तर आपण ते चेक करू शकतो.
तर असे आहे लोकहो! कुणाला फीट येताना पाहाल, तर त्याला घाबरू नका. आपुलकीने मदत करा. एपिलेप्सी ही उपचाराने बरी होणारी, आटोक्यात येणारी व्याधी आहे, व एपिलेप्सी असलेली व्यक्ती नॅार्मल जीवन जगू शकते, बुध्यांक नॅार्मल असल्यास लग्न करू शकते, नोकरी करू शकते, व मानाने जगू शकते.
– यशोदा वाकणकर